___ अंबरनाथ शहराच्या समस्या गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या प्रलंबित राहिलेल्या आहेत की त्यांचा विचार करता नव्या निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष जाणे कठीण झालेले आहे. अंबरनाथ शहराला भेडसावणारी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे रस्त्याच्या कडेला उभे रहाणारे फेरीवाले. शहरामध्ये विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात राखीव भूखंड उपलब्ध असूनही केवळ दुर्लक्ष होत असल्यामुळे फेरीवाला क्षेत्र निर्माण होत नाही आणि रस्त्याच्या कडेला गर्दीच्या ठिकाणी फेरीवाल्यांमुळे अडचणी निर्माण होत असतात. नगरपालिकेचे अतिक्रमण खाते या फेरीवाल्यांवर वेळप्रसंगांनुसार कारवाई करते आणि नेहमीप्रमाणेच हस्तक्षेप होताच फेरीवाल्यांच्या गाड्या आणि त्यांची साधने परतही करत असते. हा अनुभव फेरीवाले आणि नागरिक यांना इतका अंगवळणी पडला आहे कीअंबरनाथ शहरामध्ये फेरीवाला क्षेत्र निर्माण केला जाईल आणि त्याठिकाणी फेरीवाले व्यवस्थितपणे बिनदिक्कतपणे आपला व्यवसाय करतील हे स्वप्नवत वाटत आहे. रेल्वेतून बाहेर पडल्यावर सहजपणे चालता येणारच नाही अशी मानसिकता अंबरनाथमधील रेल्वे प्रवाशांना झालेली आहे. रेल्वे स्थानकाचा परिसरच मुख्यतः प्रचंड गर्दीचा असतोअंबरनाथ शहराच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूस रेल्वे प्रवाशांची गर्दी, फेरीवाल्यांची गर्दी, रिक्षांची गर्दी आणि यांच्याबरोबरच नाक्या नाक्यावर कोणत्याही कारणास्तव अथवा अकारण उभे रहाणाऱ्यांची गर्दी दिसून येत असते. ती गर्दी अनेकदा त्रासदायक ठरत असली तरी त्यावर उपाय कोणी करावा यातच वेळ जात असतो. तसेच फुटपाथवर मोटार सायकली, सायकल आदी दुचाकी वाहने उभी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नगरपालिका, वाहतूक खाते आणि पोलीस खाते असे सारेचजण एकमेकाकडे बोट दाखवून स्वत:ची जबाबदारी झटकण्याचे काम करत असतात. यदाकदाचित यापैकी कोणीतरी गर्दी हटविण्याचे काम केले तर शहरातील तथाकथित राजकारणी त्यात हस्तक्षेप करुन शासनाच्या अथवा प्रशासनाच्या कामावर पाणी फिरवण्याचे काम सहजपणे करत असतात. या सर्व प्रकारांमुळे अंबरनाथ शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी अडचणींचा डोंगर पहावयास मिळतो. ही अडचण दूर करावी अशी मानसिकता अंबरनाथ शहरातील राजकारण्यांना कधी येईल तो दिवस पायी चालणाऱ्या लोकांसाठी खरोखरच भाग्याचा ठरेल असे वाटते.
शहरातील गर्दीची ठिकाणे आणि अंबरनाथकर प्रवासी