नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मानसिकता निर्माण करा

अंबरनाथ शहरामध्ये दळणवळणाची अनेक साधने उपलब्ध आहेत. मात्र सार्वजनिक दळणवळणाच्या साधनांसाठी योग्य ते मार्गदर्शन उपलब्ध असल्यामुळे या वाहनांची अनेकदा परवड होताना दिसते. अंबरनाथच्या पश्चिमेकडील रेल्वे स्थानकालगत असलेल्या बस स्थानकाच्या जागेवर अतिक्रमण इतक्या मोठ्या प्रमाणात झाले आहे की, येथे येणाऱ्या राज्य परिवहन सेवेच्या गाड्या आड रस्त्याला उभ्या करुन वाहनचालकांना आपले कर्तव्य पार पाडावे लागत आहे. ही परिस्थिती खरोखरच गंभीर असून अंबरनाथ शहरामध्ये बस स्थानकाप्रमाणेच अनेक सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमणाच्या विळख्यात जात असून ही अतिक्रमणे रोखण्यासाठी अंबरनाथ शहरातील कोणत्याही क्षेत्रामध्ये सक्षम स्थानिक नेता अथवा स्थानिक संघटना अस्तित्वात नाही हेच दिसून येते. अंबरनाथ शहरातील सार्वजनिक ठिकाणांना सुरक्षित ठेवण्यासाठी शहरातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांनी सामाजिक जाणीव जपण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण होऊ न देण्यासाठी एकत्रितपणे उपाय करण्यासाठी प्रयत्न केले गेले तर अंबरनाथ शहराला सर्व प्रकारच्या सार्वजनिक सुविधा उपलब्ध होऊ शकतील आणि अंबरनाथ शहर हे सर्वाधिक सार्वजनिक सुविधा उपलब्ध करुन देणारे ठाणे जिल्ह्यातील एकमेव शहर म्हणून नावारुपाला येऊ शकते. मात्र, अशी मानसिकता येथील सार्वजनिक संघटनांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये कधी येईल हाच प्रश्न प्रलंबित आहे. विकास आराखड्यानुसार अंबरनाथ शहरामध्ये सार्वजनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी दीडशेहून अधिक भूखंड राखीव आहेत. या राखीव भूखंडांवर आरक्षित करण्यात आलेल्या कामांची पूर्तता करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून योग्य तो पाठपुरावा केला जात नसल्यानेच अंबरनाथ शहरात या सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत याचेही भान या लोकांनी ठेवणे आवश्यक आहे. विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगरपालिका स्तरावर ठराव होतातही मात्र त्याचा पाठपुरावा करुन शासनाकडून ते काम मंजूर करुन आणताना निर्माण होणारा स्वार्थ या कामांना मार्गी लावण्यात मारक ठरत आहे आणि म्हणूनच अंबरनाथ शहरातील सार्वजनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राजकीय आणि सामाजिक स्तरावर मानसिकता निर्माण होणे गरजेचे आहे. राज्य परिवहन सेवेच्या एका उदाहरणावरुनच शहरातील सामाजिक आणि राजकीय मानसिकतेचा मापदंड नजरेसमोर येतो ही वस्तुस्थिती नाकारुन चालणार नाही.