अंबरनाथ - शहराची हिरवाई राखण्याची गरज

हिरवाई राखण्याची गरज अंबरनाथ शहर हे जसे औद्योगिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते तसेच या शहरातील हिरवाई ही देखील या शहराचा परिचय देणारी एक गोष्ट होती. अंबरनाथ शहरामध्ये कारखान्यांची गर्दी असली तरी अनेक ठिकाणी गर्द हिरवी झाडी दिसून येत होती. दोन दशकांपूर्वी अंबरनाथ शहराच्या अनेक भागांमध्ये हिरवी झाडे ठिकठिकाणी दिसून येत असल्याने औद्योगिक क्षेत्राने वेढलेल्या या शहरात राहणाऱ्या नागरिकांना या हिरवळीचे अत्यंत आकर्षण वाटत होते. अतिशय निटनेटके असलेले हे शहर मुंबई परिसरातील लोकांना आकर्षित करीत होते. या आकर्षणाचे प्रमुख कारणच येथील गर्द हिरवी झाडी होती असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. __अंबरनाथमध्ये ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून आजपर्यंत लाखो रुपये खर्च दाखवला गेला आहे. पण प्रत्यक्षात खर्च केला गेलेल्या पैशातून नक्की किती झाडे लावली गेली आणि किती झाडे जगली यावर मात्र कोणीच काही बोलताना दिसत नाही. नगरपालिकेने अनेक संस्थांना आणि अनेक समाजसेवी व्यक्तींना आजपर्यंत हजारो रोपे लागवडीसाठी दिली असतील त्यांचे नक्की काय झाले याचा पाठपुरावा नगरपालिकेने आणि संबंधित समितीच्या लोकांनी केला आहे काय हा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. नगरपालिकेमध्ये शहरातील वृक्षवाढ व वृक्ष जोपासना यासाठी स्वतंत्र समिती असून तिच्या माध्यमातून सातत्याने यासाठी योजना राबवल्या जात असतात. या सर्व योजना कागदोपत्री किती मजबूत वाटतात आणि प्रत्यक्षात ही मजबुती पाणगळीसारखी गळून पडलेली दिसते.


वृक्षारोपण करणे आणि वृक्षसंवर्धन करणे हा एक अत्यंत संयमाचा विषय आहे. वृक्षांना वाढवण्यासाठी वृक्ष संवर्धन करणाऱ्याच्या मनामध्ये त्याविषयीची आवड असणे गरजेचे आहे. म्हणूनच अंबरनाथ शहरातील काही वर्षांपूर्वीची हिरवी गर्द झाडी आता कोठे गेली याचे उत्तर यातूनच मिळू शकेल. अंबरनाथमध्ये दोन दशकांपूर्वी असलेल्या रासायनिक कारखान्यांमुळे असलेली प्रदुषणाची भिती आता तितकीशी उरलेली नाही. अशावेळी शहरामध्ये जागोजागी शासकीय जागांवर आणि निवासी संकुलांमध्ये प्रदुषणाला रोखणाऱ्या वृक्षांची लागवड करणे आणि तिची जोपासना करणे यासाठी प्रयत्नपूर्वक काम करण्याची गरज आहे. प्रदूषण रोखणे हे तर जागतिक स्तरावरील कार्य बनलेले आहे. जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांमध्ये पृथ्वीचे वाढते तापमान हाही गंभीर प्रश्न आहे. या प्रश्नाला उत्तर शोधण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने स्वशक्तीनुसार एकतरी झाड लावून खारीचा वाटा उचलावा असेच सांगावेसे वाटते.